निगडीत कस्टमच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या तरूणाला पोलिसांनी केले गजाआड

0
597

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – तुम्ही कोणाच्या परवानगीने वाहने चेक करत आहेत, असे म्हणत खरेदी केलेल्या साहित्याची वस्तू व सेवा कराच्या पावतीची तपासणी करणाऱ्या कस्टमच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या एकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. हा प्रकार बुधवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौकाजवळ घडला.

लखन काचंनसिंग जुन्नी (वय ३२, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कौशल्य नवाब सिंग (वय २८, रा. उदय हिल स्टॉप, रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे वस्तू व सेवा कर या विभागात इन्स्पेक्टर आहेत. ते व त्यांचे सहकारी स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौकात वाहन चालकांकडील इलेक्ट्रॉनिक बिलची तपासणी करत होते.

यावेळी आरोपी लखन याने फिर्यादी यांना ‘तुम्ही कोणाच्या परवानगीने वाहनांची तपासणी करत आहात, तुम्ही वाहने तपासू शकत नाहीत’ असे म्हणत अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होता. चालू असलेल्या कामाता अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे, फिर्यादी सिंग यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी लखन याला अटक केली. निगडी पोलिस तपास करत आहेत.