रहाटणीतील महाराष्ट्रनगर येथे गुरुवारी (दि.५) एका महिलेने आपल्या घराच्या गॅलरीतून उडी घेतली होती. याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. पतीच्या मित्रानेच महिलेजवळ शरीर संबंधाची मागणी केल्याने हा प्रकार घडला असल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी वाकड पोलीसांनी आरोपी किशोर शेलार याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.५) रात्री पीडित महिलेचा पती दारुच्या नशेत होता. तेव्हा एकाने त्याचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल चोराच्या शोधात असताना पीडित महिलेच्या पतीला आरोपी किशोर शेलार भेटला. किशोरने मोबाईल चोराला शोधून देण्याचे आश्वासन त्याला दिले. शोधाशोध सुरु असतानाच पीडित महिलेचा पती पुन्हा एकदा किशोरला घेऊन दारु प्यायला बसला. नशेतच मध्यरात्री दोन वाजता किशोरला घेऊन महिलेचा पती घरी आला. त्यानंतर किशोर परत महिलेच्या पतीला घेऊन घराबाहेर पडला. यावेळी चोराला शोधून आणतो असे सांगून किशोरने महिलेच्या पतीला रस्त्यातच थांबवले आणि तो त्याच्या घरी आला. पतीने पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे, माझ्यासोबत चला, असे किशोरने पीडित महिलेला खोटे सांगितले.

दोन्ही मुले घरी असल्यामुळे तुम्ही पुढे जा, असे महिलेने सांगितले. पाणी मागण्याचा बहाणा करत आरोपी घरात घुसला. पीडित महिलेचे तोंड दाबून त्याने तिला चाकूचा धाक दाखवला. तुम्ही सुंदर दिसता, मला तुमच्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत. तसे न केल्यास दोन्ही मुलांना जीवे मारुन टाकेन अशी धमकी किशोरने महिलेला दिली. पीडित महिलेने किशोरच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेतली. झटापटीत चाकूने डाव्या हाताच्या बोटांना इजा झाली. महिला बेडरुमच्या बाल्कनीत आली आणि तिने अब्रू वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली.

महिला एका चारचाकी वाहनावर पडल्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. वाकड पोलीसांनी किशोरला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून बेड्या ठोकल्या. किशोरवर याआधी हत्या, हल्ला करणे आणि अमली पदार्थ बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत.