सोशल मीडियावर लाईक, कमेंट आणि शेअर करताय?; थांबा आणि थोडा विचार करा!

0
1196

अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाती-धर्मासह राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेकदा कोणत्याही घटनेची खात्री न करता माहिती आणि व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करण्याच्या  प्रकारांमुळेही जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.

माहितीचे देवाण-घेवाण करण्यासाठी उत्तम माध्यम असलेल्या सोशल मीडियाचा अलीकडे टाईमपास म्हणून वापर वाढला आहे. आक्षेपार्ह पोस्ट करून वाद निर्माण केला जात आहे. गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढले असून सायबर पोलिस ठाण्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याची टीम सज्ज आहे.

हातातल्या स्मार्टफोनमुळे तरुण वर्ग सोशल मीडियाकडे आकर्षित झाला आहे. माहितीचे आदान-प्रदान करणे सोडून लोक आता टाईमपास आणि इतरांना त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहेत. तुमच्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप, छायाचित्रे आल्यास ती तत्काळ डिलिट करा. ती माहिती इतरांना फॉरवर्ड केल्यास सायबर पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे.