रंगाचा वास येतो म्हणून चित्रकार दाम्पत्याला चक्क महापालिकेची नोटीस !

0
299

पुणे,दि.१८(पीसीबी) : पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका चित्रकार दाम्पत्याला नागरिकांच्या तक्रारीवरुन महापालिकेने रंगांचा वास येत असल्याची नोटीस पाठवली. या नोटीशी विरोधात दाम्पत्याने बाजू मांडली तेव्हा मात्र महापालिकेला आपली घोडचूक लक्षात आल्यानंतर आपली नोटीस मागे घेतली. मात्र या सगळ्या प्रकारात या दाम्पत्याला विनाकारण मानसिक त्रास सोसावा लागला.

अनामिक कूचन आणि कृष्णा कूचन असं या चित्रकार दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही कलाकार असून पुण्यातल्या कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात हे राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आणि स्टुडिओतच आपले घर मांडले. पण समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगांचा वास येत असल्याची तक्रार पुणे महापालिकेकडे केली. कधी नव्हे तर महापालिकाही इतकी सतर्क झाली की तात्काळ त्यांनी कूचन यांच्या घरी पाहणीसाठी कर्मचारी पाठवले आणि त्यांना नोटीस ही पाठवली. सोबतच पंखा लावणे, व्यावसायिक काम घरात हलवण्याचा सल्लाही दिला.

अखेर या दाम्पत्याने जेव्हा या नोटीशी विरोधात आवाज उठवला तेव्हा मात्र महापालिकेने नोटीस मागे घेतली. पण या सगळ्या प्रकारात त्यांचे कामाचे दोन महिने वाया गेले. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का असा सवाल त्यांनी विचारला आहे. एकूणच पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभार सुधारण्याऐवजी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया घालवत असल्याचे चित्र पाहायला आहे.