माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा

0
328

जळगाव, दि. १८ (पीसीबी) – जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादातून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी संचालक विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी संस्थेचे माजी मानद सचिव तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातलगांनी संस्थेची कागदपत्रं देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली होती. सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी म्हणून धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

मराठा विद्या प्रसारक संस्थेत गेल्या अनेंक वर्षांपासून भोईटे गट आणि पाटील गट या दोन गटांचा वाद आहे. दरम्यान तीन वर्षांपूर्वीचा हा विषय असून आताच का फिर्याद दिली गेली आणि पुण्याऐवजी जळगाव जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया हा गलिच्छ राजकारणाचा प्रकार आहे, ह्या फिर्यादिमागे बोलविता धनी दुसरा कोणी असल्याचा आरोप करत तीन वर्षांनी दाखल करण्यात आलेल्या ह्या गुन्ह्याची न्यायालयामार्फत चौकशी करावी, पुण्याची घटना सांगतात आणि गुन्हा दुसरीकडेच दाखल होतो, असा प्रश्न उपस्थित करत बदलेल्या सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी प्रतिक्रीया गिरीश महाजन यांनी दिली आहे.