येरवड्यात मांत्रिकाकडून विवाहितेची तीन लाखांची फसवणूक करुन बलात्कार

0
1935

पुणे, दि. ८ (पीसीबी) –  आजारी पतीची तब्येत बरी व्हावी म्हणून मांत्रिकाकडे मदतीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केला तसेच महिलेची तब्बल ३ लाख रूपयांची फसवणुकही केली. ही धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली.

याप्रकरणी पिडित ५७ वर्षीय विवाहितेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शब्बीर युनुस शेख (वय ४५) या मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ५७ वर्षीय पिडित महिला या खासगी क्लासेस घेतात. महिलेचे पती काही दिवसांपासून आजारी होते. यादरम्यान, महिलेची पुणे स्टेशन येथे शब्बीर नामक मांत्रिकाशी ओळख झाली. महिलेने त्यास पतीच्या आजाराबाबत माहिती दिली. त्यावेळी त्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही मंत्रउपचार करण्यास सांगितले. त्यासाठी महिलेकडुन वेळोवेळी असे एकूण ३ लाख रूपये घेतले. तसेच मांत्रिकाने महिलेशी जवळीक वाढवुन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मांत्रिक शब्बीर याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.