येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात शस्त्र विक्रीचे रॅकेट; भोसरी पोलिसांकडून धडक कारवाई. तब्बल ‘एवढ्या’ जणांना ठोकल्या बेड्या

0
430

भोसरी, दि.२८ (पीसीबी) : येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात राहून पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना शस्त्र विक्री करणा-या एका टोळीला भोसरी पोलिसांनी पकडले आहे. मध्ये प्रदेश मधील मुख्य सप्लायरसह तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, अमलठी, ता. चोपडा, जि. जळगाव. मूळ रा. उमर्टी, बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी. मूळ रा. धुळे), उमेश अरुण रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा. मुंढवा, पुणे), धीरज अनिल ढगारे (रा. हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, ता. हवेली), मॉन्टी संजय बोथ उर्फ मॉन्टी वाल्मिकी (रा. नेहरूनगर, पिंपरी), यश उर्फ बबलू मारुती दिसले (रा. बोपखेल), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन, पुणे), राहुल गुलाब वाल्हेकर (रा. कामथडी, ता. भोर), संदीप आनंता भुंडे (रा. बावधन, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

डिसेंबर 2020 मध्ये भोसरी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुपेश पाटील याला भोसरी येथे शस्त्र विक्रीसाठी आल्यानंतर ताब्यात घेतले होते. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म ऍक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चार पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली होती. पाटील याने त्याच्याकडील पिस्टल मध्य प्रदेश येथून आणल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी भोसरी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने मध्य प्रदेश मधील आरोपी रॉनी याच्या गावाजवळ असलेल्या जंगलात जाऊन पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्टल आणि 20 जिवंत काडतुसे जप्त केली. रॉनीचा मध्य प्रदेश येथील साथीदार कालू याला दोन पिस्टल आणि पाच काडतुसांसह अटक करण्यात आली.

रॉनी आणि कालू हे मुख्य डीलर आहेत. ते सराईत गुन्हेगार असून येरवडा कारागृहात असताना त्यांची सराईत गुन्हेगारांसोबत ओळख झालेली. त्यातून त्यांनी सराईत गुन्हेगारांच्या शहरात असलेल्या अन्य साथीदारांची माहिती घेतली होती. त्यातून त्या साथीदारांना सोशल मीडियावरून हे आरोपी संपर्क करत होते. सोशल मीडियावरून पिस्टलची मागणी आल्यास तिथून पुढचा संपर्क देऊन पिस्टल विक्रीचा काळा बाजार केला जात होता.

पोलिसांनी मुख्य सप्लायरसह 12 जणांना अटक केली. यातील अनेक गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल आहेत. धमकी, दबाव टाकून जमिनी हडप करणे, खून असे गुन्हे करणाऱ्या मुळशी पॅटर्नमधील उमेश रायरीकर (नन्या) यांच्याकडून दोन पिस्टल जप्त केल्या आहेत. नन्याच्या विरोधात निर्घृण हत्या, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.

भोर परिसरातील कुख्यात गुन्हेगार राहुल वाल्हेकर याच्याविरुद्ध खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. बावधन परिसरातील गुन्हेगार अमित दगडे याने अग्निशशस्त्राचा वापर करून खुनाचा कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

हडपसर परिसरातील टोळी युद्धातील गुन्हेगार धीरज ढगारे याच्याकडून एक पिस्टल जप्त केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. पुणे शहरात भर दिवसा अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणा-या टोळी युद्धातील कुख्यात गुन्हेगार बंटी यांच्याकडून दोन पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, संतोष महाडिक, आशिष गोपी यांच्या पथकाने ही कामगीरी केली.