युती न होण्याच्या शक्यतेने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील धास्तावले

0
6663

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याच्या स्थितीत नसल्याने पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे दोन्ही खासदार धास्तावले आहेत. मावळ मतदारसंघात सलग दोनवेळा आणि शिरूरमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सलग तीनवेळा निवडून येण्यामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही खासदार मोदी लाटेमुळे निवडून आले हे उघड सत्य आहे. आता आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती न झाल्यास मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा विजय होणे अवघड आहे. त्यामुळेच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही भाजप-शिवसेना युती व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत, असेच सध्याचे राजकीय चित्र आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी देशभर असलेल्या मोदी लाटेचा शिवसेनेच्या उमेदवारांनाही फायदा झाला. महाराष्ट्रात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे, तर शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मोदी लाट नसती, तर भाजपची साथ मिळून सुद्धा या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळणे अवघड होते. मोदी लाटेतही या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली. मावळ मतदारसंघात तर अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

२०१४ च्या निवडणुकीला पाच वर्षे सरलेली असताना आणि दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. मोदी लाटेत विजय मिळालेल्या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शहरातील जनतेने साफ नाकारले. आता या दोघांचाही आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. हे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी दोघांनाही पुन्हा खासदार होणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळेच दोघांनाही भाजपची आता खरी गरज आहे. आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावे, असे या दोघांनाही मनोमन वाटत आहे. त्यासाठी दोघांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. परंतु, केंद्रात आणि राज्यात शिवसेनेचे भाजपसोबत फारसे सख्य नसल्याने खासदार बारणे आणि आढळराव पाटील या दोघांच्याही विजयाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

शिवसेना भाजपसोबत युती करण्याच्या मनस्थितीत नाही. तसे या पक्षाचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. परिणामी भाजपसोबत युती न होण्याच्या शक्यतेने खासदार बारणे आणि आढळराव पाटील हे दोघेही प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. युती न करता निवडणुकीला सामोरे गेल्यास विजय होईल की नाही याबाबत दोन्ही खासदारांना धास्ती वाटू लागली आहे. त्यातूनच शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने पाच खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युती करण्याची मागणी केल्याचे वृत्त आले आहे. युती न झाल्यास लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची या खासदारांची भूमिका असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत युती होणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.