‘युतीसाठी आग्रह, पण शिवसेनेला निधी देण्यास टाळाटाळ’

0
438

मुंबई, दि. १ (पीसीबी) – शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नसल्यामुळे तसेच पाच कोटींचा विकास निधी मिळावा यासाठी गेल्या वर्षी अधिवेशनकाळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विकास निधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. त्याला आता वर्ष उलटले तरी अद्यापि सेनेच्या आमदारांना विकास निधी मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ शिवसेनेच्या आमदारांना गाजर दाखवत असून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मात्र हवा तेवढा निधी उपलब्ध करून देत असल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद व आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. एकीकडे आम्ही युती करावी म्हणून भाजप नेत्यांकडून मनधरणी केली जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास व सेना स्वतंत्र लढल्यास त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत. मात्र तेच मुख्यमंत्री सेनेच्या आमदारांना विकास निधी देताना हात आखडता घेत आहेत.  मी प्रतिनिधीत्व करत असलेल्या मुंबई उपनगरातत विनोद तावडे हे पालकमंत्री असून उपनगरातील विकास कामात कशी दिरंगाई होईल हेच पाहिले जात असल्याचा आरोप प्रभू यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास कामांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अतिरिक्त विकास निधी उपलब्ध करून दिला जात होता. उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सेनेच्या आमदारांना विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना तात्काळ सांगतो असे आश्वासन दिले. त्यानंतर नागपूर येथे पावसाळी आधिवेशनातही विकास निधीचा मुद्दा सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत उपस्थित केला होता. मात्र आजपर्यंत आमच्या आमदारांना विकास निधी मिळालेला नाही, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.