याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना; मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
1260

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला, तर आम्ही त्यांचे खासदार पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मित्रपक्ष शिवसेनेला दिला. ‘कोणी काही छापले किंवा लिहले तरी राज्यात आजही भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहील,’ असा दावाही त्यांनी या वेळी केला.

भारतीय जनता पक्षाने अटल संकल्प महासंमेलनानिमित्त निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेनेबरोबरील युतीसाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ‘याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना’ या भाषेत केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूरमध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत, त्यामुळे येथे सभा घेणे, हा मित्रपक्षाला इशारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा संदर्भ देऊन फडणवीस म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेतील युती संपुष्टात आली, म्हणून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील ही सभा असल्याचे बोलले जाते; परंतु ही वस्तुस्थिती नाही. या दोन्ही मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी सभा आयोजिण्यात आली आहे. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिल्यास येथून त्यांचे दोन्ही खासदार पाठवू. अन्यथा, आम्ही आमचे खासदार निवडून आणू.’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आव्हान देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे पक्ष एका व्यासपीठावर समोरासमोर यावेत. त्यांच्या सत्तेतील पंधरा वर्षांच्या आणि आमच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यावा. त्यामध्ये आम्ही उजवे ठरलो नाही तर, आगामी निवडणुकांना सामोरे जाणार नाही. विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी ‘मुंगेरीलाल’चे (विरोधी पक्षांचे) सत्तेवर येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.’