यापुढे शरद पवारांचा पंतप्रधानपदी नंबर लागणार नाही – रामदास आठवले   

0
694

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेस सत्तेत असताना  राष्ट्रवादी अध्यक्ष व खासदार शरद पवार यांचा पंतप्रधानपदी नंबर लागला असता, मात्र आता यापुढे कधी त्यांचा नंबर लागेल, असे मला अजिबात वाटत नाही. त्यावेळी शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले, त्यामुळे त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) येथे सांगितले.

पिंपरीमध्ये आज (रविवार) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

मी काँग्रेस सोबत असताना त्यावेळी तुम्ही पंतप्रधानपद स्वीकारले पाहिजे, असे मी  काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना म्हणालो होतो. आपणच पंतप्रधान व्हा, जर आपण होत नसाल तर शरद पवार यांना पंतप्रधान केले पाहिजे, अशी त्यावेळी माझी भूमिका होती, असे आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले की, त्यावेळी शरद पवारांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले, त्यांचा चान्स हुकला आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधान व्हायचे नव्हते आणि शरद पवार यांना पंतप्रधान करायचे नव्हते म्हणून अचानक मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आले, असे आठवले म्हणाले. त्यामुळे मी मनमोहन सिंग यांच्यावरील चित्रपटाशी सहमत आहे, असे आठवले म्हणाले.