…यांनाच माझा राजीनामा मागण्याचा अधिकार, इतर कोणालाही नाही – मुनगंटीवार

797

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) –  माझा राजीनामा आमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह मागू शकतात, इतर कोणालाही माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले.

पिंपरीतील एच.ए मैदानावर आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते  आज (गुरूवार) करण्यात आले,  त्यावेळी ते बोलत होते.

अवनी वाघीण नरभक्षक झाल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिला ठार   करण्यात आले आहे.  त्यामुळे नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता’ असे सांगत मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.  तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शाह मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही,असेही ते म्हणाले.

राजीनाम्याची मागणी केल्याने माझे खाते जात नाही किंवा कोणी मागणी केल्याने माझे प्रमोशनही होत नाही. राजीनाम्याविषयी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा किंवा देशाचे पंतप्रधान ठरवतील, तेव्हा राजीनाम्यावर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.