यंदा रणजी करंडक स्पर्धा नाहीच

0
432

मुंबई, दि.१९ (पीसीबी) क्रीडा क्षेत्र आता हळू हळू रुळावर येत असले, तरी कमी अधिक प्रमाणात फटकाही या क्षेत्राला बसत आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात जुन्या रणजी करंडक स्पर्धेचा या करोनाच्या एकूण वातावरणाने बळी घेतला आहे. यंदाच्या मोसमात रणजी स्पर्धा न घेण्याचा निर्णया पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ येऊन पोचले आहे. येत्या रविवारी हेणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली अजूनपही रणजी करंडक स्पर्धा घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा घेणे अशक्यच असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे पडत आहे. एका संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार रणजी करंडक स्पर्धे संदर्भात बीसीसीआयने व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय घेतला आहे. चार दिवस चालणारे रणजी करंडकाचे सामने हे जैव सुरक्षा पद्धतीत बसूच शकत नाहीत. एकूण ३८ संघांना अशा प्रकाची सुविधा पुरवणे केवळ अशक्य आहे असा विचार बीसीसीआयने मांडला आहे.

रणजी स्पर्धेच्या कालावधीचा विचार करताना बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट चालू राहण्यासाी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला पसंती दिली आहे. सध्या सुरु असलेली मुश्ताक अली टी २० स्पर्धा संपल्यानंतर या स्पर्धेची घोषणा केली जाऊ शकते. रणजी करंडक स्पर्धा होणार नसली, तरी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना त्याची भरपाई समान पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत महिलांसाठी देखील एखादी टी २० स्पर्धा घेण्याचा बीसीसीआय विचार करण्याची शक्यता आहे. करोनाच्या संकट काळानंतरही अजून महिलांचे क्रिकेट सुरू झालेले नाही. ते कायम ठेवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.