‘…म्हणून जर हिंमत असेल, तर इंधनावरील कर कमी करावेत’

0
214

मुंबई, दि.११ (पीसीबी) : “देशाच्या घटनेनुसार राज्याचे प्रमुख असलेल्या राज्यपालांविषयी धमक्यांची भाषा वापरताना कोणती नीतिमत्ता आघाडी सरकारचे नेते दाखवीत आहेत?” असा खरमरीत प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवाय इंधनावर केंद्रापेक्षा राज्य सरकारचेच कर अधिक असून हिंमत असेल, तर महाविकास आघाडी सरकारने आपले कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

“राज्य सरकारच्या मूल्यवर्धित करांसह अन्य करांचे प्रमाण अधिक आहे.भाजप सरकारच्या कार्यकाळात इंधनाचे दर वाढले होते, तेव्हा आम्ही राज्याचे कर कमी करून प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले व जनतेला दिलासा दिला होता. महाविकास आघाडी सरकारनेही केंद्र सरकारकडे बोटे न दाखविता स्वत:च्या हिमतीवर करकपातीचा निर्णय घ्यावा”, पेट्रोल, डिझेलसह इंधनाचे दर गेले काही दिवस वाढत असून ते कमी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे यासंबंधी विचारणा केली असताना फडणवीसांनी आपलं मत मांडलं. फडणवीस पुढे असंही म्हणाले कि, “रस्ते, सिंचन, रेल्वे मार्ग, मेट्रो अशा पायाभूत सुविधांसह राज्यातील सिंचन व अन्य प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून केंद्र सरकारने राज्यासाठी तीन लाख, पाच हजार, ६११ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.”