१२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप; या देशांना त्सुनामीचा इशारा

0
247

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – मागील १२ तासांमध्ये ऑस्ट्रेलियापासून ते हिंदकुश पर्वतांच्या प्रदेशामध्ये तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे या तीन धक्क्यांपैकी एक धक्का भारतातील मिझोरममध्येही बसला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय तसेच एएफपी या वृत्तसंस्थांनी दिलं आहे. ऑस्ट्रेलियाजवळच्या पॅसिफिक महासागराच्या परिसराध्ये समुद्राखाली १० किमी अंतरावर काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पहिला धक्का बसला. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तिव्रता अधिक असल्याने या देशांमधील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण पॅसिफिकमधील लॉयल्टी बेटांजवळ समुद्राच्या तळाखाली १० किमी अंतरावर मोठा भूकंप झाला. हा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता असं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे या संस्थेनं स्पष्ट केल्याचं एएफपीने म्हटलं आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. दक्षिण पॅसिफिकमधील या भूकंपानंतर काही तासांनी मिझोरममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. रात्री एकच्या सुमारास चंपाई येथे हा भूकंपाचा झटका जाणवल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा भूकंप ३.१ रिश्टर स्केलचा होता.

मिझोरमनंतर काही तासांनी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा झटका बसला. हिंदकुश पर्वतराजीत बसलेला हा भूकंपाचा झटका ४.९ रिश्टर स्केलचा होता. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार रात्री चारच्या सुमारास हिंदकुश पर्वत रांगांच्या भागामध्ये ४.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप जाणवला. दक्षिण पॅसिफिकमधील भूकंप हा जमीनीखाली खोल अंतरावर झाल्याने मिझोरम आणि हिंदकुशमधील भूकंप हे आफ्टर शॉक प्रकारातील असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय.