खडसेंच्या जळगावात जयंत पाटील; भाजपला रोखण्याची रणनिती

0
228

जळगाव , दि. १० (पीसीबी) -राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आजपासून पुढचे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा पहिलाच जळगाव दौरा आहे.

अमळनेर तालुक्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पारोळा जामनेर आणि पाचोरा येथे ते गुरुवारी पक्ष संघटनाचा आढावा घेणार आहेत. आज जामनेर आणि पाचोऱ्यामध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी भुसावळ मुक्ताईनगर आणि जळगाव विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील.

जयंत पाटील यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक जण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदा जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी या दौऱ्यात रणनीती आखण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलाय.
राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या निमित्ताने 17 दिवस, 3 हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 17 दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या 135 बैठका व 10 जाहीर सभा होणार आहेत.

या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठीही ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष किंवा संस्थानिकांचा पक्ष असल्याचं एक चित्रं आहे. ही चौकट मोडून राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि जनतेचा पक्ष असल्याची इमेज निर्माण करायची आहे. पक्षाचं हे स्वरुप बदलण्यासाठी सुद्धा ही यात्रा आयोजित केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्या त्या भागातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा धडाकाही राष्ट्रवादीने लावला आहे.