“…म्हणूनच मनसे उतरली रस्त्यावर”

0
351

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : मनसेकडून ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु करण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ही मोहीम सुरु केली असून रस्त्यावर उतरले आहेत. मनसेकडून ३० वॉर्डन नेमण्यात आले आहेत. हे वॉर्डन आठवडाभर कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम करणार आहेत.

कोरोना लॉकडाउनमुळे पूर्ण लोकलसेवा बंद होती आणि आजही आहे. सध्या अनेक चाकरमानी कामावर पोहोचण्यासाठी बस,खासगी वाहनांचा वापर करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून लोकांना कामावर पोहोचण्यासाठी तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागत आहे. कल्याण-शीळफाटा रस्त्यावरही अशाच पद्धतीनं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने आता मनसेनेच आता पुढाकार घेतला आहे.

बेशिस्त वाहतुकीला चाप लावून व नियमांचे पालन करून इच्छाशक्तीच्या जोरावर कल्याण शिळफाट्याची वाहतूक कोंडी फोडून दाखवू असंही ते म्हणाले आहेत. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात. त्यांचा जास्त वेळ हा कल्याण-शीळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो.

राजू पाटील यांनी ट्विट करत फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी मनसैनिक वाहतूक कोंडी फोडणार असून कल्याण-डोंबिवलीकरांची असह्य वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी “वाहतूक सौजन्य सप्ताह” सुरु केल्याचं सांगितलं आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर कल्याण-शिळफाटा रोडवरील वाहतूक कोडी कशी फोडता येऊ शकते याचा ट्रेलर पहायला मिळेल असंही ते म्हणाले आहेत. राजू पाटील यांनी सर्व नागरिक आणि वाहनचालकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.