टक्केवारी जोमत – अर्धा टक्का की चकटफू वादामुळे स्थायी समिती सभा लांबणीवर

0
305

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – पाणीयोजनेच्या ५४ कोटी रुपयांच्या निविदेत स्थायी समितीने टक्केवारी घेऊ नये, उदार हेतूने प्रस्ताव ‘चकटफु’ मंजुर करावा असा आग्रह भाजप आमदाराने घेतल्यावर किमान अर्धा टक्का तरी मिळावा या मागणीवर स्थायी समिती सदस्य अडून बसले. ‘अर्धा टक्का की चकटफू या वादात तोडगा निघत नसल्याने स्थायी समिती सभा एक आठवडाभर लांबणीवर टाकण्याची खेळी सभापतींनी केली.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (दि.२८) ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. सभेच्या विषयपत्रिकेवर ११५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश होता. त्यात पाणी योजनांच्या १०० कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे.त्या पैकी ५० कोटींच्या निविदेत ठेकेदारांचे संगनमत झाले असून ५४ कोटी रुपयांच्या निविदेत स्पर्धाच झालेली नाही. दोन्ही निविदांसाठी ठेकेदारांनी जादा दर सादर केले असून त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.५४ कोटींच्या कामाचा ठेकेदार कागदोपत्री दाखविण्यात आला असून आमदाराचे दोन भाचे काम करणार आहेत. त्यामुळे ५४ कोटींच्या कामात टक्केवारी मागता कामा नये, अशी सुचना आमदाराने केली.

स्थायी समितीतील आपल्या समर्थक नगरसेवकांनाही तसे बजाविले. १६ सदस्यीय स्थायी समितीने ‘पारंपरिक’ टक्केवारी देऊ नका किमान अर्धा टक्का तरी द्या, अशी विनवणी केली. तथापि, अर्धा टक्काही देण्यास आमदाराने सपशेल नकार दिला. त्यामुळे दुखावलेल्या स्थायी समितीने पुढील बुधवार (दि.४) पर्यंत सभा लांबणीवर टाकण्याची खेळी केली. त्यासाठी गणसंख्या हे कारण पुढे करण्यात आले.  

————————