दि.१४(पीसीबी)-आज मोशीमध्ये त्रिरत्न मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय सुरू करण्यात आले. माझ्या हातून त्याचे उद्घाटन करण्याचा योग आला. त्यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेबांनी या जगाला मानवतेची शिकवण दिली. समता, बंधुता, स्वातंत्र्य या तत्वाने जगण्याचे बळ दिले. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या सूत्राने जगण्याचा मार्ग सांगितला.
जीवनाला स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे शिल्प बनवायचे असेल तर ज्ञानाचे कोंदण घालायला हवे. ते ज्ञान ग्रंथ वाचनातून मिळेल. उद्याच्या पिढीला द्यायचेच असेल तर ज्ञान देता येईल, संस्कार देता येतील. धनसंपत्ती विरून जाईल, ज्ञानसंपदा विरणार नाही ती मनामनात रुजत राहील. याच संकल्पनेतून या तरुण मित्रांनी ग्रंथालय सुरू केले आहे. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हेच अभिप्रेत आहे. मस्तकाची मशागत पुस्तक वाचूनच होईल. मानवतेची रुजवात विचारांतून होईल. म्हणूनच या ग्रंथालयाला अर्थ आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना, वाचनसंस्कृती रुजली तरच विचारप्रवृत्ती वाढेल. माणसांच्या मनात विचार रुजला तरच माणूस माणसाशी माणसासम वागेल, यावर माझी श्रद्धा आहे. म्हणूनच या सर्व तरुण मित्रांनी चालविलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
अरुण बोऱ्हाडे.
(बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे)

















































