पिंपरी, दि. १५ : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद ठेवून थेट पवना नदीत सांडपाणी सोडणाऱ्या रावेत येथील एका गृहनिर्माण सोसायटीवर महापालिकेने कारवाई केली आहे. पर्यावरण विभागाच्या पथकाने एक लाख दोन हजार ५०० रुपयांचा दंड सोसायटीला आकारला आहे. सात दिवसांत दंड न भरल्यास पाण्याचे नळजोड बंद करण्याचा इशारा दिला आहे.
शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्थांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित न करणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांवर महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे. रावेत येथे ३४५ सदनिका असलेली मोठी सोसायटी आहे. या सोसायटीमधील सांडपाणी प्रकल्प बंद आहे. सोसायटीमधील सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात आले होते. या बाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागाला तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पथकाने पाहणी केली.
या पाहणीत संबंधित सोसायटीचा सांडपाणी प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले. तसेच, कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याचे आढळले. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या पथकाने नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद केले. सोसायटीला एक लाख दोन हजार ५०० रुपयांचा दंड आकारला. सोसायटीधारकांनी सात दिवसांत दंड न भरल्यास पाण्याचे नळजोड बंद करण्याचा इशारा पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी दिला आहे.

















































