“देवेंद्र फडणवीसजी, निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती…” – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
1243

देश कोरोना महामारीत गेले महिनाभर अक्षरशः जळतोय आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री आमित शाह निवढणुक प्रचारात गर्क आहेत. देशाभिमानी कोणालाही लाज वाटावी असेच हे चित्र आहे. कोरनामुळे रोज शेकडो लोक हकनाक मरतात. आता कोरना बाधितांचा रोडचा आकडा सरासरी तीन लाख, तर मृतांचा सुमारे २ हजारावर पोहचला. मोदींनी परवा माध्यमांतून बोलताना, कशाचीही कमी पडू देणार नाही, असा फक्त एक संदेश दिला. वास्तवात कुठेही आजुबाजुला पाहिले तर एकच दृष्य दिसते ते म्हणजे ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, बेड नाही आणि व्हेंटीलेटरही नाही. रोज शेकडो बळी जातात. आकडा वाढतोच आहे आणि सरकार म्हणते धीर धरा. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे फक्त महाराष्ट्रच पेटला आहे, असे चित्र दाखवले. प्रत्यक्षात भाजपाचे सरकार ज्या ज्या राज्यांत आहे तिथे अक्षरशः आणिबाणी सदृष्य परिस्थिती आहे. आशाही परिस्थितीत भाजपाचे गलिच्छ राजकारण हे किळस आणणारे आहे. खोटेपणा पाहून लोकांच्या मनातून भाजपा उतरली आहे. हे सिध्द करण्यासाठी आता अनेक दाखले देता येतील. मोदी-शाह आणि राज्यात ज्यांच्याबद्दल खूप आदर, आपुलकी वाटत होती त्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीसुध्दा लोक आता बोटे मोडतात. कोरोना च्या संकटात सगळे मतभेद विसरून महाराष्ट्रच नाही तर देश म्हणून एकत्र यायला पाहिजे, पण ते झाले नाही. महाराष्ट्राला पाण्यात पाहिले गेले. महाआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिक्षा पहायचेच मोदी-शाह आणि फडणवीस यांनी ठरवले आहे की काय, अशी दाट शंका येते. सुदैवाने महाराष्ट्र सरकार प्रत्येक ठिकाणी केंद्राला अगदी पुरून उरते. कोरोना संकटातही सरकार पडत नाही आणि पाडण्याचा प्रयत्न झाला तर आता लोकच अंगावर येतील अशी परिस्थिती आहे. किमान भाजपा सारख्या सुसंस्कृत पक्षाकडून हे वर्तन अपेक्षित नाही.

खोटेपणाचा कळस किती ते पहायचे तर देशातील प्रमुख दहा शहरांच्या स्मशानात जी २४ तास प्रते जळतात ते डोळे उघडे ठेवून पहा. महाराष्ट्राचे रोजचे आकडे तपासू शकता. पण गुजराथ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, झारखंड चे कोरनाचे आकडे संशयास्पद आहेत. तिथे आकडे दडपले जातात हे विरोधकांचे आरोप सोडा, पण वास्तव चित्र तेच आहे. जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी आज पोस्ट शेअर केली आहे, त्यात गुजराथ समाचार या गुजराथमधील मोठ्या दैनिकाची फक्त सुरत शहर आवृत्तीची तीन पाने निव्वळ आदरांजली, श्रध्दांजलीच्या किती जाहिराती आहेत हे पाहून डोळे फाटतील.

सुरत मध्ये २४ तास जळणाऱ्या स्मशानाची चिमणी अक्षरश- पाघळली. वलसाड च्या हॉस्पिटलमध्ये प्रेतांचा खच तीन दिवस पडून होता, कारण स्मशानात नंबर लागत नव्हता. त्या प्रेतांचा वास मारायला सुरवात झाली तेव्हा कुठे प्रशासन जागे झाले. राजकोट शहरात २४ तासात १०१ प्रेतांवर अंत्यसंस्कार त्या शहराने प्रथमच पाहिले. भडोस शहरात एका अंत्यसंस्कारासाठी सहा तास लागत होते इतक्या प्रेतांची रांग मोठी होती. अखेर लाकडे संपली होती. अहमदाबाद शहरात रोज किमान १०० लोकांवर अंत्यसंस्कार होतात, सरकार म्हणते २०-२५. हॉस्पिटलमध्ये शवागरात प्रेते ठेवायला जागा नाही. बडोदा सारख्या मोठ्या शहरांतून होते. म्हणजे गुजराथमध्ये कोरोनामुळे शेकडो मृत झाले, पण सरकारी आकडे २०-२५ च्या पुढे गेलेच नाहीत. शेवटी गुजराथ उच्च न्यायालयाने भाजपा सरकराचे कान धरले आणि अहो, ही स्त्युनामी आहे, स्त्युनामी लक्ष द्या, असे खडसावले. मोदी-शाह यांच्या राज्यात त्यांच्या बुडाखाली काय झळते हे त्यांना दिसले नाही किंवा त्याचे यत्किंचितही वाईट वाटले नाही कारण तिथे भाजपाचे राज्य आहे.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ या शहरात रोज १०० ते १५० मयत होतात आणि सरकारी आकडा १०-१२ असतो. इंदोर शहरात एकाच वेळी ४५ प्रेते जळतानाच्या ज्वाला आणि ड्रोन मधून घेतलेला तो फोटो माध्यमांतून प्रसिध्द झाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून इतके काही नाही, अशा अविर्भावात आहेत. ऑक्सिजन न मिळाल्याने भोपाळमध्ये १२ रुग्ण दगावले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुख झाल्याचे ट्विट दिसले नाही, पण नाशिक मध्ये ऑक्सिजन गळती अपघातात २४ रुग्ण दगावले तेव्हा त्यांना वाईट वाटले. उत्तर प्रदेशचा राजधानी लखनऊ शहरात कोरनाने अक्षरशः थैमान घातले आहे. भैसा कुंट स्मशनात १८४ प्रेतांवर अंत्यसंस्कार झाल्याचा व्हिडीओ आहे, आणि सरकारी रेकॉर्ड १०-२५ चा आकडा सांगते. कानपूर शहरातील फक्त एका हॉस्पिटलमध्ये रोज १०-१२ मृत होतात आणि सरकार सांगते पूर्ण जिल्ह्यात १०-१५ मृत होतात. प्रत्यक्षात या जिल्ह्याच्या प्रत्येक शहातून मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार झाल्याचे लोक सांगतात. खुद्द मोदी यांचा मतदारसंघा असलेल्या वारणसीचा घाट गेले आठ-दहा दिवस अखंड जळतोच आहे. एका मातेला मुलाचे प्रेत नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर त्या अभागी मातेने स्वतःच एका रिक्षातून मुलाचा तो निश्चल देह स्मशआनात नेला. तो फोटो पाहून दगडालाही पाझर फुटेल, पण भाजपाला घम नाही याचेच आश्चर्य वाटते. गाझियाबाद शहरात एका वेळी ४२ प्रेत रांगेत होती. रस्त्याच्या दुतर्फा तिरड्या ठेवल्याचा फोटोच सत्य सांगत होता. भाजपाचेच राज्य असेल्या मुख्यमंत्रू येडीयुरप्पा यांच्या कर्नाटकातील बेंगळूरु या राजधानीत रोज २०० प्रेतांना अग्नी दिला जातो, पण सरकार राज्यातून फक्त ५०-७० मृत असल्याचे खोटे सांगते. बोमानहाली या स्मशानाच्या बाहेर शववाहिनीची रांग बोलकी आहे. छत्तीसगड राज्यात प्रेत नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून ट्रक मध्ये दहा प्रेते वाहून नेल्याचे चित्र देशाची अब्रू वेशीवर टांगणारे आहे. मोदी-शाह यांना त्याचे काहीच वाटत नाही याचेच दुःख होते.

देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा –
दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ताब्यात घेण्यावरून जे राजकारण रंगले तेसुध्दा महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारे कृत्य होते. गुजराथ राज्याच्या सिमेवरच्या या कंपनीत ५० हजार इंजेक्शनचा साठा आहे, ते काळा बाजार करतात वगैरे बातम्या होत्या. गुजराथ पोलिसांनी त्या कंपनीच्या संचालकाला अटक केली आणि इकडे त्याच कंपनी संलाकाची बाजू घेऊन चक्क देवेंद्र फडणवीस मध्यरात्री २ वाजता पोलिस ठाण्यात जातात. ५० हजार इंजेक्शनचा साठा या कंपनीत होता तर फडणवीस यांनी अन्न ओषध प्रशासनाला कंपनीवर छापा टाकून इंजेक्शन ताब्यात घ्यायची सुचना करायला पाहिजे होते. प्रत्यक्षात ती इंजेक्शन आम्ही ताब्यात घेऊन सरकारला देणार होतो, हा फटणवीस यांच्या सारख्या सत्यवादी माणसाचा युक्तीवाद न पटणारा आहे. महाराष्ट्रात एका एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जनता दोन दोन दिवस पायपीट करते, शेकडो रुग्ण इंजेक्शन न मिळाल्याने दगावले आहेत आणि दुसरीकडे गुजराथ भाजपाच्या सुरत कार्यालयात हीच इंजेक्शन चक्क मोफत वाटली जातात. हे गौडबंगाल लोकांना समजत नाही, असे फडणवीस, प्रविण दरेकर यांना वात असेल तर ते … नंदनवणात आहेत, असेच म्हणावे लागेल. ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आज हाहाकार आहे. अक रुग्ण केवळ प्राणवायू मिळाला नाही म्हणून दगावलेत. दुसरीकडे ऑक्सिजन मिळविण्यासाठी विशाखापट्नमला तीन दिवसांपूर्वी गेलेली ऑक्सिजन एक्सप्रेस जाणीवपूर्वक खोळंबून ठेवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. मोदी- शाह यांच्या मदतीने मनात आणले असते तर देवेंद्र फडणवीस यांनी सगळी मदत केली असती, पण ते गंमत पहात बसले. महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यातसुध्दा भेदभाव झाल्याचे लोकांनी पाहिले. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णांची संख्या पाहता देशात सर्वात बिकट परिस्थिती असताना केंद्र सरकारने गुजराथ, मध्यप्रदेशला अधिक वाटा दिला. आकडेवारीसह महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केंद्राचा खोटेपणा उघड केल्यावर परिस्थिती सुधारली. आज सर्वोच्च न्यायालयाला कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारचा कान धरावा लागला यातच सगळे आले. लोक मरतात, जगण्यासाठी टाहो फोडतात, स्मशानातील मृतांच्या नातेवाईकाची किंकाळी एकल्यावर वास्तवाचे भान येते. राज्य सरकार, प्रशासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले का तर त्याचे उत्तर १०१ टक्का `होय` असेच आहे. उद्धव ठाकरेंना जमत नाही, अजित पवार लक्ष घालत नाही, काँग्रेसचे नेते गंमत पाहतायत. खरोखर राज्यातसुध्दा आज आणिबाणीच आहे. लॉकडाऊन करायचा की नाही यावर ठाकरे यांनी होय म्हटले की फडणवीस यांनी नाही म्हणायचे. लोक रस्त्यावर मरत असताना असा राजकीय खेळ दोघांही शोभा देत नाही. लोकांना व्यवस्था आणि एकूणच राजकारणाची घृणा वाटायला लागली. त्याला फडणवीस यांच्यासारखा एक चांगला नेताही तितकाच कारणीभूत आहे. या बिकट प्रसंगात भाजपाने सबुरीने घेतले आणि उलट मदतीचा हात पुढे केलाच तर पुढचा काळ त्यांचाच आहे, अन्यथा महाआघाडी रडतखडत पाच वर्षे पूर्ण करणार. कोरोना सगळ्यांची परिक्षा पाहतोय हे विसरू नका. निवडणुका येतील जातील, पण गेलेली माणसे पुन्हा येणार नाहीत. उद्या पं. बंगाल मिळेलही, पण आततायीपणात उद्या महाराष्ट्र कायमचा गमवावा लागेल, हे लक्षात असू द्या.