‘रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे राजकारण सुरूच, आरोप- प्रत्यारोप’

0
215

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. अशावेळी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यावरुनही राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पुरवल्या जाणाऱ्या इंडेक्शन्सचा आकडा देण्यात आलाय. यात महाराष्ट्राच्या वाट्याला पहिल्यापेक्षा कमी इंजेक्शन्स येत असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जारी केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला 50 हजार इंजेक्शन्सची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. मात्र, आपल्याला सध्या दिवसाला 36 हजार इंजेक्शन्स मिळत आहेत. नव्या निर्णयांमुळे ही संख्या अजून कमी होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राची स्थिती बिकट होईल, अशी भीती अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांनी व्यक्त केलीय. तसंच केंद्रानं महाराष्ट्राची दिवसाची 50 हजार इंजेक्शन्सची गरज पूर्ण करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.
दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नाराजी व्यक्त केलीय. केंद्राने कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचं याच नियंत्रण स्वत:कडे घेतलं आहे. यातून महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल यामध्ये २६ हजार रेमडेसिवीर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयाने राज्यात १० हजार रेमडेसिवीरचा तुटवडा भासणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीर आयात करू शकत नाही. तो केंद्राचा अधिकार आहे. निर्यातदारांचा साठा वापरू शकत नाही. त्यावर केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्राने पीएओ स्तरावर रेमडेसिवीर निर्माण करणाऱ्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा व देशाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही टोपे यांनी केंद्राकडे केलीय.

तर रेमडेसिव्हीरची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50000 ची. मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे. आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26000, महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी? असा सवाल गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय.

केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिव्हीरचं वाटप करताना राज्यातील सक्रीय रुग्णसंख्येचा विचार केला. त्यानुसार महाराष्ट्राला सर्वाधिक 2 लाख 69 हजार इंजेक्शन्स मिळाले आहेत. खरं तर रेमडेसिव्हीर प्राप्त करणं हे राज्याचं काम. पण तरीदेखील केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शन्स दिले. अशावेळी केंद्रावर टीका करणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा आणि राजकारण असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय. त्याचबरोबर ‘ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात महाराष्ट्राला 50 हजार रेमदेसीवीर हवे आहेत, आव्हाड म्हणतात 70 हजार आणि बोरूबहाद्दर संजय राऊत म्हणतात 80 हजार. मनाला येईल ते प्रत्येक जण बोलतोय. अहो, बोलण्यापूर्वी एकदा ठरवा तर की कोणता आकडा सांगायचाय ते’, असा टोलाही भातखळर यांनी लगावलाय.