“मोदी उद्या गोवर्धन पर्वतदेखील विकतील”

0
232

मुंबई,दि.२४(पीसीबी) – मोदी सरकारने एलआयसीशिवाय अनेक कंपन्या विक्रीस काढल्या आहेत. आधीच्या सरकारने जर काहीच केले नाही तर मोदी विकत काय आहेत, असा सवाल करीत मोदी उद्या गोवर्धन पर्वतदेखील विकतील, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

कृषी कायद्याविरोधात तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरून राजकारण आता अधिकच तापले आहे. या मुद्दय़ावर काँग्रेसने उत्तर प्रदेशात शेतकरी महापंचायतीचे आयोजन केले असून मंगळवारी पालीखेडा येथील महापंचायतीला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी अहंकारी आणि भेकड असून या सरकारमुळे जनता त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमचे सरकार येताच कृषी कायदे रद्द केले जातील असे आश्वासन प्रियांका गांधी यांनी यावेळी दिले.

मोदींचे शेतकऱ्यांसोबत नेमके कोणते वैर आहे हे कळत नाही. मोदी संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यांचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी बोलतात. भाजप सरकारने अन्नदात्यांविरोधात अहंकार बाळगला आहे. 90 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपली लढाई लढत आहेत. यात 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याकाळात मोदी जगभरात सगळीकडे पोहोचले, पण त्यांना शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही, असा सवालही प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.