…त्यामुळे रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ सहा महिने पुढे ढकलण्यात यावी; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

0
130

मुंबई,दि.२४(पीसीबी) – कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले असून अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. तर अनेकांना पगारकपातीला सामोरे जावे लागले आहे. सर्वसामान्यांची क्रयशक्तीच मोठय़ा प्रमाणावर खालावल्याने रिक्षा आणि टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाडय़ात थेट तीन रुपयांची वाढ आणि त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी दोन रुपयांहून अधिक दरवाढ ही सर्वसामान्यांच्या हालअपेष्टात अधिक भर घालणारी ठरणार आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ सहा महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

ऑटो रिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षा भाडय़ात रु. 2.01 आणि टॅक्सी भाडय़ात रु. 2.09 वाढ सुचविण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांहून जास्त कालावधीत रिक्षा आणि टॅक्सींची भाडेवाढ झालेली नाही हे जरी खरे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता या दरवाढीमुळे ग्राहकांकडून रिक्षा-टॅक्सीचा दैनंदिन वापर मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालक आणि मालकांना दिलासा देण्याचा शासनाचा जो मूळ उद्देश आहे तोच अवाजवी आणि अकाली भाडेवाढीमुळे सफल होऊ शकणार नाही. हे वास्तव जाणूनच खुद्द रिक्षा युनियननी सद्यस्थितीत भाडेवाढ करू नये अशी मागणी केली आहे.