मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

0
802

कामशेत, दि. १७ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना भरधाव कारची जोरदार धडक बसल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारी एकच्या सुमारास पिंपळोली गाव हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली.

हरिचंद्र यादव (वय ३९, रा. इंदिरानगर, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरिचंद्र हे रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या परिवारासोबत पुण्याकडे येण्यासाठी त्यांच्याकडील कारने निघाले होते. ते पिंपळोली गावातील मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाजवळ पोहचले असता रस्त्याच्या पलीकडील मॉलकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत होते. यावेळी भरधाव कार (क्र. एमएच/१२/एलपी/१३३७) ने हरिचंद्र यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.