भाजप,शिवसेनेची युती होणारच; रावसाहेब दानवेंना ठाम विश्वास  

0
743

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. युती झाल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही यश मिळवू, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.  

दानवे पालघरमध्ये  बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजप शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका आम्ही जिंकू.  पाच राज्यात जरी भाजपचा पराभव झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत वेगळी परिस्थिती असणार आहे. आम्ही जनतेसमोर गेल्या साडेचार वर्षात केलेली विकासकामे घेऊन जाणार आहोत, असे दानवे म्हणाले.

दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुफडासाफ झाला आहे. याचा  भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि  दानवे यांनी युती करण्याबाबत सातत्याने विधाने केली आहेत.