मुंबईच्या नावाने काव काव करणारे डोमकावळे ‘तेव्हा’ गप्प का असतात ?? मुंबई का तुंबली; शिवसेनेनं दिले उत्तर

0
204

मुंबई,दि.२४(पीसीबी) – मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबले. घरे, रुग्णालयांसह अनेक कार्यालयांत पाणी गेले. त्यावरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. यातच शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामना मधून टीकाकारांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.

मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक बोंबा मारणे सुरूच ठेवतात. हेच लोक नागपूर, अहमदाबाद जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

दरम्यान ‘मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण २४ तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसे होणार? मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो २४ तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. १९९४ ते २०२० या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता,’ याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.