भल्या पहाटे सुरत हादरलं….ONGC कारखान्यात शक्तिशाली स्फोट

0
243

सुरत,दि.२४(पीसीबी) – सुरतच्या हाजिरा परिसरातील ONGC कारखान्यात गुरुवारी (24 सप्टेंबर) पहाटे एक शक्तिशाली स्फोट घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर कारखान्यात आगसुद्धा लागल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

एएनआयने स्फोटाचा एक व्हीडिओदेखील ट्वीट केला आहे. स्फोटानंतर भूकंप झाल्यासारखं वाटल्याचं स्थानिकांनी सांगितले. बीबीसीने सुरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांच्याशी बातचीत केली.
ते सांगतात, “हाजिराच्या ओएनजीसी कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अडीच वाजता हायड्रोकार्बन वायू जमा झाला त्यानंतर 3 वाजून 5 मिनिटांनी एकामागून एक तीन स्फोट झाले.

अग्निशमन दलासह ओएनजीसीचं आगनियंत्रण पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पोलीस, सीआयएसएफ तसंच संबंधित शासकीय अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित आहेत. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. “ओएनजीसी याठिकाणी वायूचा दाब कमी करण्याबाबत काम करत होती. आग याच परिसरात लागली आहे. कारखान्याच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी आग पसरलेली नाही, असं डॉ. पटेल यांनी सांगितलं.
अग्निशमन दलाचे अधिकारी ईश्वर पटेल यांनीही याबाबत अधिक माहिती दिली.

“मुंबईकडून हाजिराकडे येणाऱ्या गॅस पाईपलाईनला ही आग लागली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण काही ठिकाणी वायूगळती सुरू आहे. वायूगळती बंद होत नाही, तोपर्यंत आग काही प्रमाणात कायम राहू शकते. आग आणि गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय दोन ओएनजीसी कर्मचारी बेपत्ता असून त्यांचाही तपास सुरू आहे,” असं ईश्वर पटेल म्हणाले.