मी तर शरद पवारांचा चक्रधारी; मलाच माढ्यातून उमेदवारी हवी – दिपकराव साळुंखे

0
1244

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माढ्याचे खासदार असताना त्यांचा चक्रधारी (गाडीचा चालक) म्हणून मी अठरा हजार किलोमीटर त्यांच्यासोबत प्रवास केला आहे. मला या मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे. पवार यांचा संपर्कप्रमुख म्हणूनही मी काम केले आहे.  त्यामुळे  या मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळायला हवी, असे माजी आमदार दिपकराव साळुंखे यांनी म्हटले आहे.

साळुंखे म्हणाले की, माढा मतदारसंघातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. मी विधानपरिषदेचा आमदार असताना येथे विकासकामे केली आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण खटाव या तालुक्यातही माझा चांगला  संपर्क आहे. मी शरद पवार यांचा संपर्कप्रमुख असताना मी गाव ना गाव फिरलो आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे.

पवारसाहेबांचा आदेश मानून तीन विधानसभा निवडणुकीत आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबत काम केले आहे. पवार सांगतील तो आदेश मी मानत आलो आहे. माढा मतदारसंघासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र तळागाळातील सामान्य माणसांशी संपर्क असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे’, अशी भावना साळुंखे यांनी व्यक्त केली.