मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नका – शरद पवार

0
593

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका, असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. यामुळे पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा आढावा घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची आज (शनिवार) शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक सुरु आहे. यावेळी पवारांनी  पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. मात्र,पवारांनी मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका,अशी स्पष्ट भूमिका घेतली.

पवार २०१९ मध्ये पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी पुण्याचा गड राखला होता. मात्र, राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेतील भ्रष्टाचार आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली.मात्र, त्यांना पराभव  स्वीकारावा लागला. सध्या विश्वजित कदम हे  कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे  पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर भाजप सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करु शकतात. अशा वेळी पवार लोकसभेत निवडणून येणे आवश्यक आहे. त्यामुळे ही रणनिती असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

तर दुसरीकडे रायगडमधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जिल्हा पातळीवरुन माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव पुढे आले आहे. तर हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोडण्याबाबत यावेळी चर्चा झाली.