मीडिया आणि लोकांशी नम्रतेने वाग!; विराटला तंबी

0
647

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्याने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी तंबी समितीने विराटला दिल्याचे समजते. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, २१ नोव्हेंबरपासून यजमानांविरूद्ध टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीनं विराटला ही तंबी दिली आहे.

भारतीय फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असं एका चाहत्यानं म्हटलं होतं. त्यावर विराट कोहलीचा पारा चढला आणि त्याने क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला. परदेशी खेळाडू आवडत असतील तर खुशाल देश सोडून जा, असं विराटनं म्हटले होते. त्यावर विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनेही विराटला धारेवर धरल्याचे समजते. समितीतील सदस्यांनी विराटशी फोनवरून चर्चा केली. आक्रमकपणा प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग, अशी ताकीद दिली. भारतीय कर्णधारपदाला साजेसे असे वर्तन असायला हवे, असा सल्लाही समितीने दिला. त्यावर विराटने काय उत्तर दिले हे समजू शकलेले नाही. मात्र, समितीनं दिलेला सल्ला विराटने खूपच मनावर घेतला आहे, असे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.