आता तुम्ही कमी बोला, मी जास्त बोलतो; गिरीश बापटांचा खासदार काकडेंना टोला

0
1269

पुणे, दि. १७ (पीसीबी) –  खासदार शिरोळे हा सच्चा कार्यकर्ता आहे. ते कमी बोलतात पण खूप चांगला माणूस आहे, असे खासदार संजय काकडे यांनी भाषणात  म्हटले.  यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी खासदार शिरोळे यांच्याकडे बघत काकडेंना सांगा आता तुम्ही कमी बोला, मी जास्त बोलतो, अशी टिप्पणी केली. यावर  सभागृहात एकच हास्या पिकला.

पुण्याचे भाजप खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य प्रकाशन अहवालानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बापट, शिरोळे, काकडे  या तिघांची  राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली.  कार्यक्रमाच्या  सुरवातीला खासदार शिरोळे यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केला.

यानंतर काकडे म्हणाले की, शिरोळे कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्याबाबत लोकांचे गैरसमज होतात. मात्र ते सच्चा, प्रामाणिक माणूस आहे, अशा शब्दांत स्तुतीसुमने उधळली. यानंतर भाषण करताना बापट म्हणाले की, शिरोळे कमी बोलतात, असे आता खासदार काकडे यांनी सांगितले. मात्र यापुढे आता तुम्ही कमी बोला. मी जास्त बोलतो, असे काकडे यांना सांगा, असे शिरोळे यांच्याकडे बघत बापट यांनी  राजकीय टोलेबाजी केली.