मालमत्तेसाठी आईची हत्या, मुलीवर गुन्हा दाखल

0
530

पुणे, दि.१३ (पीसीबी) – मालमत्तेच्या वादातून विवाहित मुलीने झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फुल्ला उर्फ दिव्या सुनील शहा (वय ४८, रा. सागर को-ऑप सोसायटी, लष्कर) असे गुन्हा दाखल केलेल्या माहिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई शारदा आजारी पडल्याने प्रफुल्ला यांनी त्यांना १८ ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शारदा यांना भेटण्यासाठी आनंद पटेल आणि अन्य नातेवाइकांना मज्जाव करण्यात आला. त्यानंतर २२ ऑगस्टला शारदा यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी शारदा यांना खासगी वाहनाने अहमदाबाद येथे नेण्यात आले आणि तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. आईकडील ६० लाख रुपये आणि मालमत्ता बळकाविण्यासाठी बहीण प्रफुल्ला यांनी प्रवासादरम्यान झोपेच्या जादा गोळ्या दिल्या. जादा गोळ्या दिल्याने आईचा मृत्यू झाल्याचा आरोप पटेल यांनी तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणी पटेल यांनी कोर्टात खासगी फौजदारी दावा दाखल केला. कोर्टाने खासगी फौजदारी दाव्याचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी आईच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याच्या आरोपावरून प्रफुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.