राष्ट्रवादी आणि आघाडी पुरस्कृत तिन्ही उमेदवारांना मनसेचा जाहीर पाठिंबा

0
570

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना शहर मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबाबतची घोषणा मनसेचे प्रदेश नेते राजेंद्र वागसकर आणि मनसे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे, चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे, भोसरीतील अपक्ष उमेदवार विलास लांडे, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नवनाथ जगताप, नगरसेविका निकीता कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

राजेंद्र वागसकर म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात भूमिका घेत राज्यभरात १२ सभा घेतल्या होत्या. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे राज्यात मनसेचे उमेदवार नसतील, त्याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्हीही मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आणि अपक्ष उमेदवारांना मनसेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी आमदार अण्णा  बनसोडे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे स्वागत आणि धन्यवाद देतो. मनसेच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जाईल. निवडणुकीच्या प्रचारात मनसेला सहभागी करून घेतले जाईल, तसेच राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेत मनसेचा झेंडा वापरण्यात येईल, त्याचबरोबर फ्लेक्सवर राज ठाकरे यांचे छायाचित्र लावले जाईल.