माढ्यातून लोकसभा लढवणार; शरद पवारांची घोषणा

0
638

सोलापूर, दि. २१ (पीसीबी) – माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा आग्रह आणि देशातील नेते मंडळींमुळे आपण माढा लोकसभा  मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी  घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरूवार) केली.

आमदार बबनदादा शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात  पवार यांनी ही घोषणा केली. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व गट-तटाचे कार्यकर्ते या सहभोजनासाठी उपस्थित होते.

त्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील सर्व गटांना एकत्रित करण्याचे प्रयत्न केले होते. स्नेहभोजनानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पवारांनी हात वर करुन कार्यकर्त्यांना विचारले आणि स्वतःची उमेदवारी घोषित केली.

दरम्यान, खासदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांचा बबनदादा शिंदे गटाला मोठा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पवारांना स्वतःची उमेदवारी घोषित करावी लागली आहे. २००९ मध्ये माढ्यातून शरद पवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही पवार निवडून येतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.