मोहननगरमधील मारूती भापकर ढोंगी असल्याचे सिद्ध झाले; चार-पाच पक्ष फिरून झाल्यानंतर दुसऱ्यांदा शिवसेनेला जय महाराष्ट्र

0
813

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारे, मोहननगर परिसरात ढोंगी राजकारणी म्हणून कुप्रसिद्ध असलेले आणि चार-पाच राजकीय पक्ष फिरून आलेले माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात भापकर यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना नेत्यांनी षडयंत्र रचून आपला पराभव घडवून आणल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दोन वर्षे ते शिवसैनिकच म्हणून वावरत होते. आता दोन वर्षानंतर आपला पराभव कसा झाला याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. भापकर यांनी केलेल्या या आरोपाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी सडेतोड उत्तर दिले असून, स्वतःच्या स्वार्थासाठी विविध राजकीय पक्षांत कोलांटउड्या मारणाऱ्या भापकरांनी आपली उंची तपासावी. प्रसिद्धीलोलुप भापकरांनी शिवसेनेवर टिका केल्यास सहन केले जाणार नाही, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.

मारूती भापकर हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील रंग बदलणारे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. शहराच्या राजकारणात फारशी उंची गाठलेली नसली, तरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही स्टंटबाजी करण्यास सदैव तत्पर असलेले म्हणूनही भापकर यांना ओळखले जाते. भापकर यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरूवात झाली. परंतु, २००७ च्या महापालिका निवडणुकीत ते मोहननगर भागातून अपक्ष निवडून आले. त्यावेळी त्यांनी मोहननगर भागातील नागरिकांना अनेक आश्वासने दिली होती. तसेच यापुढे मी शिवसेनेत कधीच जाणार नसल्याची शपथही त्यांनी जनतेसमोर घेतली होती. परंतु, नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांना जनतेची नस ओळखता आली नाही आणि २०१२ च्या महापालिका निवडणुकीत याच जनतेने भापकरांना घरी बसवले.

त्यानंतर ते अनेक सामाजिक चळवळीसोबतच पाच-सहा राजकीय पक्ष फिरून आले. सामाजिक चळवळीतून मते मिळत नसल्याने त्यांनी रिडालोसमध्ये जात आमदारकी लढवली. रिडालोसला सोडचिठ्ठी देऊन नंतर ते आम आदमी पक्षात गेले आणि लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु, त्यांना कोठेच यश आले नाही. आम आदमी पक्षात जाण्यापूर्वी त्यांनी अण्णा हजारे यांच्या संघटनेतही काम केले. आम आदमी पक्ष सोडल्यानंतर त्यांनी स्वराज अभियाना झेंडा हातात घेतला. परंतु, स्वराज अभियान पक्षाला राजकीय भवितव्य नसल्याचे ओळखल्यानंतर भापकर यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. शिवसेनेत कदापीही जाणार नसल्याची भापकर यांनी जनतेसमोरच शपथ घेतली होती. परंतु, सोईस्कर राजकारण करण्याचे गुण अंगात भिनलेले भापकर शिवसेनेत गेल्यानंतर मोहननगरमधील जनतेवर बोटे स्वतःच्या तोंडात घालण्याची वेळ आली.

भापकर यांचा हा रंग बदलण्याचा कारनामा लक्षात आलेल्या जनतेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ताकद दाखवली. भापकर यांना कायमचे घरी बसवले. आता या पराभवाला दोन वर्षे झाल्यानंतर भापकर यांना शिवसेनेच्याच नेत्यांनी षडयंत्र रचून आपला पराभव केल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेत झालेली युतीही भापकर यांच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे भापकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. सोबत चार कार्यकर्तेही नसलेल्या भापकर यांना स्वतःला फार मोठे नेते असल्याचा भास होऊ लागला आहे. त्यामुळे भापकरांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे सांगितले आहे. तसेच भापकर यांनी काही प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शिवसेनेला स्वाभिमानशून्य, लबाड आणि लाचार म्हटले आहे. त्यांच्या या टिकेचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

भापकर यांनी आधी स्वतःची राजकीय उंची तपासावी. ते महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेत आले होते. भापकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक राजकीय पक्षांमध्ये कोलांटउड्या मारलेल्या आहेत. त्यामुळे भापकर यांनी शिवसेनेवर टिका करताना जे शब्द वापरले आहेत, ते मुळात त्यांनाच लागू होतात. भापकर यांनी विविध आंदोलने करताना स्वतःपुढे कधीही शिवसैनिक हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे शिवसेनेवर टिका करताना भापकर यांनी आपला राजकीय इतिहास तपासून पाहावा. शिवसेनेवरील टिका कदापीही सहन केली जाणार नाही, असा इशारा दाखले यांनी दिला आहे. त्यामुळे भापकर यांचे ढोंगी राजकारण उघडे पडले आहे. आता ते कोणत्या राजकीय पक्षाची सुपारी घेऊन यापुढे काम करतात हे पाहणे मोहननगरमधील नागरिकांसाठी मनोरंजनाचे ठरणार आहे.