माझ्या गालावर सणसणीत चपराक- प्रकाश राज

0
493

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – सरकारवर खुलेपणाने टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपले मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज राजकारणाच्या आखाड्यात उतरले खरे पण लोकसभा निवडणुकीत ते पराभवाच्या मार्गावर आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रकाश राज यांना जवळपास १३ हजार मते मिळाली असून या मतदारसंघातून काँग्रेसचे रिझवान अर्शद आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट केले आहे. ‘माझ्या चेहऱ्यावर ही सणसणीत चपराक आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे. जितका अपमान, ट्रोलिंग आणि अपशब्द माझ्या वाट्याला येतील.. मी तितकाच धर्मनिरपेक्ष भारतासाठीचा माझा लढा सुरू ठेवीन. पुढील कठीण प्रवासाला आता फक्त सुरुवात झाली आहे. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्यांचे खूप खूप आभार,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.