माझे सरकार रिमोटवर चालत नव्हते; माजी पंतप्रधान मनमोहन सिंगाचे स्पष्टीकरण

0
445

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – माझे सरकार कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते. मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे. राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी आम्ही केली. मात्र, सरकार यासाठी तयार नाही. यावरुनच ‘दाल में कुछ काला’आहे, असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला. 

देशातील जनतेला राफेल कराराबाबत संशय आहे, असे सांगून सिंग म्हणाले की, मोदी सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे.  शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. त्यांच्या पिकांना योग्य दर मिळत नाही. मोदीने  प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन  देऊन  फसवणूक केल्याची टीका त्यांनी केली.

नोटाबंदी आणि अपूर्ण जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.  मध्य प्रदेशमध्ये व्यापमं महाघोटाळा झाला, राज्यातील भाजपा सरकार पुरेसा रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. व्यापामं घोटाळ्यामुळे  ७० लाख युवकांचे आयुष्य  उद्‌ध्वस्त झाले आहे. तर  ५० हून अधिक  नागरिकांना आपले प्राण द्यावे लागले आहेत, असे ते म्हणाले.