‘माझी ही शेवटचीच निवडणूक’ – नितीश कुमार

0
182

पटणा, दि. ५ (पीसीबी) – बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते. आपली ही शेवटची निवडणूक असल्याने जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच पक्षाच्या विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुर्निया जिल्ह्यातील प्रचारादरम्यान नितीश कुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान नितीश कुमार यांच्या प्रचारादरम्यान त्यांना अनेक निषेध आंदोलनांना सामोर जावं लागलं हे विशेष. यावेळी त्यांनी ‘अंत भला, तो सब भला’ असा डायलॉगही मारला.

नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर लोकजनशक्ती पार्टीचे नेते अजय कुमार म्हणाले, “मी कायमच नितीश कुमार यांनी निवृत्त व्हावं या मताचा होतो. आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीच आहे तर त्यांनी जेडीयूतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करावी.”

तर राष्ट्रीय लोकसमाज पार्टीचे प्रमुख उपेंद्र खुशवाहा यांनी नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्यांचे आभार मानले आहेत. तसेच कुमार यांना आशीर्वाद देऊन त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.
नितीश कुमार यांनी अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेवर आश्चर्य व्यक्त करताना काँग्रेसनं म्हटलं की, “नितीश कुमार यांचं हे राजकीय विधान असू शकतं, ते आता मतांसाठी इमोशनल कार्ड खेळू पाहत आहेत.” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदम मोहन झा म्हणाले, “नितीश कुमार यांना आपण या निवडणूक हरणार असल्याचं जाणवत असल्यानेच त्यांनी अशी घोषणा केली आहे.”