महाविकासआघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची मोठी भूमिका; आम्ही मार्गदर्शक गमावला – मुख्यमंत्री

0
168

मुंबई,दि.२५(पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पटेल यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केला आहे.

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.