“प्रताप सरनाईकांनी धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांबद्दल केले धक्कादायक खुलासे”. म्हणाले…

0
352

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) काल मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सकाळी ८ वाजताच ईडीकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान ईडीच्या लोकांनी घरी आल्यानंतर नाष्टा आणि जेवण केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. तेव्हा त्यांनी या गोष्टींचा खुलासा केला.

प्रताप सरनाईक म्हणाले कि, “माझ्या तसंच मुलांच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. चार पाच वेळा चहा घेतला, जेवण केलं. एखाद्या घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती आहे. माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं, यथोच्छ पाहुणचार केला,” अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे. पण एक मात्र आहे ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

“ईडीच्या लोकांनी माझं ऑफिस, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची रितसर कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. त्यातही त्यांचं समाधान झालं नाही. ज्यावेळी ते मला बोलावलील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्या प्रश्नानां उत्तर देण्यात समर्थ आहे,”

“विहंगसोबत फोनवरुन बोलणं झालं. ईडीने त्याला अनेक व्यवसायासंबंधी प्रश्न विचारले. टॉप्स नावाची एक एजन्सी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मालकाचे आणि आपले काही आर्थिक संबंध, व्यवहार आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. एक सुरक्षा एजन्सी म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या कार्यक्रमात त्यांचे सुरक्षारक्षक ठेवत असतो. त्याचे रितसर पैसेही दिले आहेत. माहिती विचारली तर देऊ,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.