महापालिकेच्या ऊर्दू शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरा; भाजप युवती आघाडीची मागणी  

0
424

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऊर्दू शाळेतील शिक्षकांची ४५ रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत . तसेच वर्ग खोल्या, मैदान आणि इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरात १४ ऊर्दू शाळा चालविल्या जातात. रूपीनगर, थेरगांव, खराळवाडी, लांडेवाडी, नेहरूनगर आणि दापोडी येथे इयत्ता ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षकांची ४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी नियमित शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने मानधनावर रिक्त पदे भरण्यात यावीत. शाळेत पुरेशा वर्ग खोल्या, मैदान आणि इतर भौतिक सुविधांचा अभाव आहे. क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षकांचीही भरती करणे आवश्यक आहे.

बहुतेक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तेथील समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्तव्य व जबाबदारी याची काहीही माहिती नाही. समितीची बैठकही घेतली जात नाही. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि समितीच्या सदस्यांनी शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कारवाई करण्याची गरज आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.