महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेत राज्यातील 11.25 लाख शेतकरी पात्र

0
364

सातारा, दि.6 (पीसीबी): राज्य सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 42 हजार शेतकरी खातेदार पात्र ठरले असून त्यांना 224 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. यापैकी 35 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर 185 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सहकार मंत्री व जिल्हा बॅंकेचे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, राज्यातील 11.25 लाख शेतकरी खातेदारांवर कर्ज नाही, असे गृहीत धरून त्यांना पुढील कर्जासाठी पात्र ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कार्यकारी समितीची बैठक शुक्रवारी संचालक मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील कृषी कर्जमाफीच्या सद्य स्थितीबद्दल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्यांनी आणि बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी याबाबत माहिती दिली.
राज्य सरकारच्या महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेत राज्यातील 11.25 लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना आठ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या सर्वांवर कर्ज नाही, असे गृहीत धरून त्यांना पुढील कर्जासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हा बॅंकेचे 42 हजार खातेदार कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यांच्यासाठी 224 कोटी मंजूर झाले आहेत. त्यापैकी 35 हजार शेतकरी खातेदारांच्या बॅंक खात्यांमध्ये 185 कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित सात हजार खातेदारांना राज्य सरकारकडून 39 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याचीही पूर्तता लवकर होईल, असेही सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले. करोनाच्या संकटातून कोणीही सुटले नसले तरी सातारा जिल्हा बॅंकेवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.