महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर घडली घटना

0
291

वॉशिंग्टन, दि.१३ (पीसीबी) : कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद भारताबाहेर सुद्धा उमटताना दिसत आहे. दिवसेंदिवस दिल्लीतच आंदोलन तीव्र होत असताना वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला आहे.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. खलिस्तानी घटकांनी खलिस्तानी झेंडा पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशासोबतच देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिंग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.

याबाबत माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. शांती व न्यायाचं प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असं दूतावासानं म्हटलं आहे. दूतावासानं अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.