“भाजपने काळ्या कायद्याच्या समर्थनासाठी पवार यांच्या ‘या’ पत्राचा आधार घेतला”

0
162

मुंबई,दि.१३(पीसीबी) – केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. हे कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांची कृषी कायद्यांबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

‘शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी बाजार समित्यांबाबत सुधारणा हवी का? अशी भूमिका घेतली व तसे एक पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले. भाजपने काळ्या कायद्याच्या समर्थनासाठी पवार यांच्या या पत्राचा आधार घेतला. पवारांचा आजचा विरोध हे ढोंग आहे असे ते म्हणतात. परंतु, पवारांनी १० वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता,’ असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी केलं आहे.

‘पवारांनी १० वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. त्यावेळी अंबानी-अदानी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बड्या उद्योगपतींचा हा पसारा गेल्या ६ वर्षात वाढला आहे. शेतीमालाविषयी नवे धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे आहे. सर्व काही तोट्यातच चालले आहे. शेती पिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ व त्यामानाने मिळणारे कमी दाम यामुळे शेती ही किफायतशीर राहिलेली नाही, तर धोकाच बनला आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘शेतकरी दुसरा कोणता व्यवसाय करणार? किराणा मालाच्या व्यवसायातही बडे उद्योगपतीच घुसले. शेतकरी खचला तर देशाचे सर्व अर्थशास्त्र व समाजव्यवस्था कोसळून पडेल. मंत्री येतील व जातील परंतु या देशाची शेतीच नष्ट झाली तर देश भकास होऊन जाईल,’ अशी खंत संजय राऊत यांनी मांडली आहे.