“महाकुंभ आणि निवडणुकांमुळे देश कोरोनाग्रस्त झाला तर जबाबदार कोण???”- थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
247

कोरोना… कोरोना… कोरोना… देशात सुमारे तीन लाख रुग्ण, दीड हजार मृत. राज्यात ७० हजार रुग्ण, हजार मृत. पिंपरी चिंचवड सारख्या शहरात रोज तीन हजार पेशंट आणि किमान ५४-५५ मृत… सर्वत्र स्मशानकळा आली आहे… थोडे आजुबाजुला पाहिले….गुजराथ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील स्मशानांचे आणि हॉस्पिटलचे काही व्हिडीओ पाहिले…मृतांचे अक्षरशः ढीग पडलेत… भोपाळच्या स्मशानात एकावेळी तब्बल ४०-४५ प्रेत जळतानाचा किंवा वलसाड मधील रुग्णालयात तीन दिवसांपासून पडून असलेल्या प्रेतांना दुर्गंधी सुटलेला व्हिडीओ पाहिला…, वाराणसी म्हणजे काशी… इथे गंगेचा घाट २४ तास अखंड पेटलेला आहे… एका प्रेतावर अंत्यसंस्कारासाठी पूर्वी १० हजार घेत आता २०-२५ हजारासाठी नाडतात…कित्येक ठिकाणी स्माशनातील लागडे संपली आहेत… मन सून्न कऱणारी ही एक एक बातमी… मध्य प्रदेशात केवळ ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून १२ पेशंट एका रात्रीत मृत झाले… उत्तरेत प्रत्येक शहरात कमी अधिक प्रमाणात हेच दिसते…दक्षिणेकडे कर्नाटक, तमिळनाडू, केरळ मध्ये आता रोज पेशंटचा आकडा हजाराने वाढतो आहे. केरळ आणि तमिळनाडू राज्यांनी आपल्याकडे येणारे रस्ते बंद करायला सुरवात केली आहे… देशाची राजधानी असलेले शहर दिल्ली… आता तिथे घरटी एक कोरोना पेशंट असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हादरलेत… आज रात्री पासून दिल्लीला कुलूप लागणार… दिल्ली वाचवा अशी आर्त हात आता केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलीय…परिस्थिती हातातून गेल्याचे केजरीवाल यांच्याही लक्षात आले…

२५ लाखांचा कुंभ मेळा ठरणार ‘महाबॉम्ब’ –
उत्तरखंडात हरिद्वारला कुंभ मेळाव्याच्या निमित्ताने २५ लाखावर भक्तांनी गंगेत डुबकी मारली…वाजतगाजत हजारों नव्हे तर लाखाच्या मिरवणुका झाल्या… कुठेही मास्क नव्हता की सोशल डिस्टंन्सिंग… गेल्या आठवड्यात महाकुंभ मेळाव्याचे मुख्य संयोजक असलेले महंत कोरोनाने आजारी पडले आणि स्वर्गवासी झाले… पाठोपाठ दुसरे दोन मोठे महंत निवर्तल्याच्या बातम्या आल्या… तब्बल दीड-दोन हजार संत महंतांना कोरोनाने अलिंगन दिल्याचे नंतर पुढे आले…आता पंतप्रधान मोदींनी पुढचे स्नान रद्द करा आणि प्रतिकात्मक कुंभ करा,असे आवाहन केले… दुसरीकडे वर्षापूर्वी मुस्लिम बांधवांच्या मरकजमुळे देश कोरोनाग्रस्त झाल्याचा टाहो फोडणारे आता कुंभ मेळाव्यावर बालोयला तयार नसल्याने राजकारण तापले आहे… वेळ हातातून निघून गेली आहे… कारण कुंभ मेळावा हाच आता देश कोरनाग्रस्त होण्याचे सर्वात मोठे कारण ठरू शकतो…महाकुंभ मधून जे लाखो भक्तगण आपापल्या मूळ ठिकाणाकडे परतले तेच आता महाबॉम्ब ठरण्याची शक्यता आहे… कोण, कुठले याचे ट्रेसिंग सुरू झाले, पण तोवर कोरनाचा प्रसार देशभर झालेला असेल…केंद्र सरकारच्याही पायाखालची वाळू सरकली आहे… आता देशभर लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जातेय…केवळ कुंभ मेळाव्यामुळे पुढचा महिना हा आता पूर्ण देशाची परिक्षा पाहणार असणार आहे…कोरोना हा काही जात, धर्म, भाषा, प्रांत पाहून बाधा करत नाही हे या मंडळींना कोणी सांगायचे…

कोरोना पसरण्यास बडे नेतेच जबाबदार –
गेल्या दीड दोन महिन्यांपासून पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुका यासुध्दा मोठा घात कऱणार आहेत… पश्चिम बंगालमध्ये आठ टप्यांतील निवडणुका आणि प्रचारासाठी होणाऱ्या महाजंगी सभा देशाने पाहिल्या… मोदी-शहा यांच्या पासून भाजपाचे अर्धे केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी अक्षरशः तळ ठोकून आहेत…सभा, रॅली, शक्तीप्रदर्शनातून प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडाला… आसाम, तमिळनाडून, केरळ आणि पॉंडेचरी या राज्यांतसुध्दा कमी अधिक हेच गर्दी कऱणारे चित्र आहे… कुठेही कोरोनाची भिती नाही, कोणीही कोरोना प्रसार होऊ नये म्हणून मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझेशन कऱणे हे नियम पाळत नाही… निवडणुकिचे आणखी तीन टप्पे आणि २ मे रोजी निकाल म्हणजे आणखी तीन आठवडे हा राडा चालणार आहे… दरम्यान, धोका ओळखून राहुल गांधी यांनी त्यांच्या सर्व नियोजित सभा रद्द केल्या. तृणमूल कांग्रेसनेही जाहीर प्रचार कमी केला आणि काही ठिकाणी नेत्यांनी तो थांबवला… भाजपाला जिंकण्याची उर्मी असल्याने ते कुठेही थांबायला तयार नाहीत… दुसरीकडे कोरोना या राज्यांतून सुमारे ५०० च्या पटीने वाढतोय… निवडणूक निकालानंतर या राज्यांची काय स्थिती असेल याची कल्पना न केलेली बरी… महाराष्ट्रात अवघ्या १५ दिवसांत कोरोना बाधित आणि मृतांचाही आकडा दुप्पट झाला…देशाच्या २०-२५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत… राज्य सरकार सर्व मार्गाने रोज जमेल तो प्रयत्न करते, पण आता त्यातही भाजपाने रेमडिसिवेर इंजेक्शनमध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू केले ते किळसवाणे होते…पुढच्या मे महिन्यापर्यंत महाराष्ट्र कंट्रोल मध्ये असेल आणि उत्तरेतील भाजपा राज्य करत असलेली राज्य कोणत्या स्थितीत असतील ते न सांगितलेले बरे… निवडणुकांमुळे ही देश कोरोनाग्रस्त होण्याची अधिक शक्यता आहे… त्याला तमाम पुढारी मंडळीच जबाबदार असतील… कोरोनामुक्तीसाठी मोठे नेते काही पावले उचलतात असे दिसत नाही… सर्वांचे लक्ष निवडणुकांकडे आहे…या स्वार्थी, मतलबी राजकारणापायी आगामी काळात जगात अमेरीकेला मागे टाकून भारत कोरोना मध्ये पहिल्या क्रमांकावर दिसल्यास वाईट वाटू नये… आता या झापडबंद नेत्यांचे डोळे कधी उघडणार त्याचीच प्रतिक्षा आहे…