वाढता विरोध, तरी ‘सुपरलीग’ची घोषणा

0
322

माद्रिद (स्पेन), दि.१९ (पीसीबी) : फ्रॅंचाईजी आणि फुटबॉलपटूंचे उखळ पांढरे करणाऱ्या नव्या ब्रेकवे सुपर लीगची घोषणा करण्यात आली असली, तरी या लीगच्या आयोजनास विविध स्तरातून वाढता विरोध होत आहे. युईएफए आणि फिफा या अनुक्रमे युरोपातील आणि जागतिक फुटबॉल शिखर संघटनांनी एका क्षणात हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मुळ स्वरुपाला छेद देणारी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा दम ‘फिफा’ने दिला आहे. त्याचवेळी या नव्या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडू आण क्लबवर बंदीची तयारी युईएफएने ठेवली आहे.

आकर्षक महसूल निर्माण होण्याचे भासवून युरोपमधील आघाडीच्या १२ क्लब संघांनी या लीगची स्थापना केली आहे. युईएफएच्या प्रचलित असणाऱ्या चॅंपियन्स लीगला शह देण्यासाठी या लीगची निर्मिती होत असून, त्याला विविध फुटबॉल अधिकारी आणि अगदी राजकीय नेत्यांनीही विरोध केला आहे.

विशेष म्हणजे एकीकडे युईएफए आपली चॅंपियन्स लीग स्पर्धा ३२ संघाची करण्याची तयारी करत असताना आणि नवे नियोजन आमलात आणत असतानाच या नव्या लीगची घोषणा करण्यात आली आहे.

कोणते आहेत क्लब
या नव्या लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेड, रेयाल माद्रिद आणि युवेंटस हे मोठे क्लब या नव्या लीगचे सदस्य आहेत. पण, युईएफएने त्यांच्यावर सर्व प्रकारच्या स्तरातून बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या लढ्यात मातब्बर राजकीय व्यक्ती देखील उतरल्या आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या नव्या लिगला कडाडून विरोध केला असून, युईएफएला पाठिंबा व्यक्त केला आहे.

मॅंचेस्टर युनायटेडप्रमाणे इंग्लिश प्रमियर लीगमधील लिव्हरपूल, मॅंचेस्टर सिटी,चेल्सी, अर्सेनल आणि टॉटेनहॅम हॉट्सपूर यांनी या नव्या लीगशी जोडण्याची तयारी दर्शविली आहे. बार्सिलोना, अॅटलेटिको माद्रिद स्पेनमधन आणि एसी मिलान, इंटर मिलान हे बडे क्लबही या नव्या प्रवाहात येण्यास तयार झाले आहेत.

युरोपियन सुपर लीगमुळे फुटबॉलची प्रतिमा मलिन होणार आहे. ही लाट रोखण्यासाठी फुटबॉल अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलावीत आमचा त्यांनाच पाठिंबा असेल.
-बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

कशी असेल रचना
सुपर लीगच्या नियोजनानुसार येथे १५ संस्थापक सदस्य असतील आणि स्पर्धा २० संघांत खेळविली जाईल. उर्वरिच पाच संघ हे दरवर्षी पात्रता फेरीतून निश्चित होतील.

या क्लब संघांत ४.१९ दशलक्ष डॉलरचा (अंदाजे ३१३.७० कोटी रुपये) महसूल वाटला जाईल. हा निधी कोविड १९ मुळे परिणाम झालेल्या फुटबॉल अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येईल. याची सर्वात महत्वाची अट म्हणजे यातील एकही पैसा संघाना खेळाडूंवर खर्च करता येणार नाही.

चाहत्यांशिवाय फुटबॉल शून्य आहे. गेले वर्षभर आम्ही हे अनुभवत आहोत. आता फुटबॉलवरील हे नवे संकट रोखायचे असेल, तर लवकरात लवकर प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात यावी. नव्या लीगची कल्पना अशी हवेत विरुन जाईल.
-गॅरेन लिनेकर, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू

युरोपातील अन्य संघ लीगशी जोडले जावेत यासाठी सुपर लीग त्यांना ‘युईएफए’ सध्या देत असलेल्या महसूलाच्या १० पट अधिक महसूल देण्यास तयार आहे. मात्र, अट एकच की या संघांनी करार करताना तो किमान २३ वर्षांचा करायला हवा.

फुटबॉलचा भविष्यातला विकास आणि प्रसार आम्हीच करणार असा चंगच या नव्या सुपर लीगने बांधला आहे. रेयाल माद्रिदचे अध्यक्ष आणि सुपर लीगचे पहिले कार्याध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ म्हणाले,’फुटबॉल हा एकमेव वैश्विक खेळ असून, भविष्यात प्रत्येक स्तरावर तसेच जगात फुटबॉलला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज फुटबॉलचे जगाच्या कानाकोपऱ्यात असंख्य चाहते आहेत. त्यांना खरा आनंद मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे.’

विशेष म्हणजे स्पेन, ब्रिटन, इटलीमधील प्रमुख क्लब सुपर लीगशी जोडायला लागले असले, तरी अजून जर्मन आणि फ्रान्समधून एकही क्लब पुढे आलेला नाही.

‘ फिफा ‘चा कडाडून विरोध
फुटबॉलच्या एकीला छेद देणारा हा निर्णय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा एकीला आणि मुळ स्वरुपाला छेद देणाऱ्या या लीगचा प्रस्ताव आम्ही फेटाळत आहोत, असे ‘फिफा’ने जाहिर केले आहे. मात्र, सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदी टाकण्याचा आणि त्यांच्या विश्वकरडंक स्पर्धेवरील सहभागास निर्बंध लादणे अशा प्रकारची कुठलीही घोषणा ‘फिफा’ने केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

युईएफएचे कडक निर्बंध
युईएफएने मात्र ही लाट रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. युरोपमधून या लीगशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक संघांस त्यांच्या स्थानिक स्पर्धेत सहभागी होण्यास निर्बंध घातले आहे. त्यानुसार ला लिगा, सिरी ए आणि प्रिमिर लीगस्पर्धेत अशा संघांना खेळता येणार नाही. त्यांना जागतिक स्तरावर होणाऱ्या अन्य क्लब स्पर्धांही खेळता येणार नाही. लीग बरोबर न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या फ्रान्स आणि जर्मनमधील संघांचे युईएफएने विशेष कौतुक केले आहे.