“महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार?”

0
249

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : राज्यात कोरोना उच्छाद मांडत आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. राज्यातील करोना संकट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे राज्यातील दिवसागणिक रुग्णवाढीचा वेग वाढत असून, त्याचा अतिरिक्त भार आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात बेडबरोबरच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्याकडून सातत्याने केंद्राकडे मागणी केली जात आहे.

“सगळं केंद्रावर फाडून मोकळं व्हायचं. रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र. ऑक्सिजन केंद्र. मग तुम्ही काय करता? रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करायला १९ दिवस लागतात, गुजरात सरकारने तो कालावधी ४ दिवसांवर आणला. तशी वेगळी मशिनरी उभी केली. आता २२ तारखेनंतर खूप इंजेक्शन उपलब्ध होतील, कारण अडीच कोटी इंजेक्शन फॅक्टरीमध्ये तयार आहेत. पण, ती १९ दिवसांशिवाय बाहेर काढता येत नाही. गुजरातने नवीन युनिट उभं केलं आणि ते चार दिवसांवर आणलं. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन निर्मितीची केंद्र सुरू झाली. महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्राकडे… तुमचं काय कर्तृत्व आहे? उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असं चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका करत म्हंटल आहे.

पुढे पाटील असंही म्हणाले कि, “विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं?,”