“मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले; त्यांची भूमिका अगदी योग्य”

0
218

मुंबई,दि.०८(पीसीबी) – शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान नाणार रिफायनरी ही राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. लोकांचा पाठिंबा असेल तर आम्ही या प्रकल्पासाठी तयार आहोत, असे शिवसेना म्हणते. मुळात लोक मोठ्याप्रमाणावर या प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी तयार आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिल्यास ते या प्रकल्पाचे समर्थनच करतील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.