“भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा तातडीने उपलब्ध करा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांची मागणी

0
483

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णसंख्या वाढत आहेत. रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये साधारण बेड उपलब्ध होत आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज आहेत. हे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो आहे. ही बाब विचारात घेऊन महापालिकेच्या नव्याने झालेल्या जिजामाता, थेरगाव, आकुर्डी आणि तालेरा रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड तातडीने उपलब्ध करावेत, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याबबात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना संजोग वाघेरे पाटील यांनी विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. आजच्या घडीला दररोज दोन ते तीन हजारांच्या दरम्यान कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात बेडसंख्या अपुरी पडू लागली आहे. ज्या रुग्णांना त्रास होत नाही. ते रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतात. त्यामुळे साधारण बेडची मागणी अधिक नाही. परंतु, शहरात मागील काही दिवसांपासून गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

या रुग्णांना ऑक्सिजन बेडची तातडीने गरज भासते. ऑक्सिजन बेडबरोबर प्रकृती अधिक खालावत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आवश्यक असतात. सद्यस्थिती महापालिकेकडे आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, काही रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार करताना आार्थिक लूट केली जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांच्या हितासाठी तातडीने अधिकाधिक ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड वाढविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

भोसरी, जिजामाता रुग्णालय सद्यस्थितीत कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयोगी ठरत आहेत. या दोन्ही रुग्णालयात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड नाहीत. भोसरी, जिजामाता रुग्णालयासह थेरगाव, आकुर्डी, तालेरा रुग्णालयात आयसीयू विभागात तातडीने सुरू करावेत. तेथे ऑक्सिजन बेडसह आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची सुविधा रुग्णांना मिळाल्यात शहरातील अधिकाधिक रुग्णांचे जीव वाचतील. या उद्देशाने तातडीने कार्यवाही करावी आणि शहरातील या नव्याने झालेल्या रुग्णालये संकटाच्या घडीला ख-या अर्थाने कोरोनावरील उपचारासाठी उपयोगात आणावीत, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.